२६ नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठवले.
२७ ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.
२८ देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”१
२९ ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली.
३० देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.
३१ पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव.
३२ तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील;
आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद
ह्याचे राजासन देईल;
३३ आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य
करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
३४ मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.”
३५ देवदूताने उत्तर दिले,
“पवित्र आत्मा तुझ्यावर येईल
आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील;
म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला
पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.
३६ पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे.
३७ कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.”
३८ तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.