३३ मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले.
३४ ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”
३५ मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
३६ ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
३७ पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले.
३८ त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?
३९ माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.”
४० असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले.
४१ मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”
४२ मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला.
४३ तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
४४ मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”
४५ तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले;
४६ आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्या दिवशी मेलेल्यांतून उठावे,
४७ आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
४८ तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात.
४९ पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.”
५० नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला.
५१ मग असे झाले की, तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला.
५२ तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले;
५३ आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.