७ नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.
८ तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”
९ ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”
१० त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा;
११ आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
१२ मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.”
१३ तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
१४ नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.
१५ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;
१६ कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
१७ मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा;
१८ कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.”
१९ मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”
२० त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.