१२ नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला;
१३ आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;
१४ हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
१५ “जबुलून प्रांत व नफताली प्रांत,
समुद्रकिनार्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा,
परराष्ट्रीयांचा गालील -
१६ अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय
झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व
छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”
१७ तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
१८ नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.
१९ त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
२० लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
२१ तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले.
२२ मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.