२३ नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.
२४ आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.
२५ मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.
१ तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
२ मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.
३ “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
४ ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
५ ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’
६ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
७ जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
८ ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
९ जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
१० नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
११ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.
१२ आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
१३ तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
१४ तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.
१५ दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.
१६ त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.