१७ नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे.
१८ कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
१९ ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.
२० मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
२१ ‘खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
२२ मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
२३ ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले,
२४ तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.
२५ वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील.
२६ मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस.
२७ ‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
२८ मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
२९ तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
३० तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
३१ ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते.
३२ मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.