१६ पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
१७ माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील,
१८ आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.
१९ जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल.
२० कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.
२१ भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;
२२ आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
२३ जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.
२४ गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही.
२५ शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?
२६ ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
२७ जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.
२८ जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.
२९ दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही.
३० तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत.
३१ म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.
३२ जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन;
३३ पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
३४ मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे.
३५ कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे;
३६ आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’
३७ जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;
३८ आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.
३९ ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील.
४० जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.
४१ संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.
४२ आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.