२० नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला :
२१ “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता.
२२ पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल.
२३ हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.
२४ पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”
२५ त्या वेळी येशू असे बोलू लागला : “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या.
२६ खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.
२७ माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
२८ अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
२९ मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’
३० कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.