२२ मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला.
२३ तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
२४ परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.”
२५ येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.
२६ सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार?
२७ आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
२८ परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
२९ अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.
३० जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
३१ ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.
३२ मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही.
३३ ‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.
३४ अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.
३५ चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
३६ मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.
३७ कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.