१ त्या वेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली,
२ आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे.”
३ कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते;
४ कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.”
५ आणि तो त्याला जिवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत.
६ नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.
७ त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”
८ मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.”
९ तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली;
१० आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला.
११ मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले.
१२ नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.