१३ ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला; हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायीपायी गेले.
१४ मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्यांना त्याने बरे केले.
१५ दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावांत जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
१६ येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.”
१७ ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
१८ तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.”
१९ मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.
२० मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या.
२१ जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुलेदेखील होतीच.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.