१ मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात?
२ कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.”
३ त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता?
४ कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’
५ परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’
६ अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.
७ अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की,
८ ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व]
ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
९ ते व्यर्थ माझी उपासना करतात;
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात
ते असतात मनुष्याचे नियम.”’
१० तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या :
११ जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
१२ नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?”
१३ त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल.
१४ त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”
१५ पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
१६ तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय?
१७ जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय?
१८ जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते.
१९ कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.
२० ह्या गोष्टी माणसाला विटाळवतात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.