१ तेव्हा परूशी व सदूकी ह्यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता, ‘आम्हांला आकाशातून काही चिन्ह दाखवा,’ अशी त्याच्याकडे मागणी केली.
२ त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’
३ आणि तुम्ही सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ अहो ढोंग्यानो, तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळांची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत.
४ दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
५ नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.
६ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”
७ तेव्हा ते आपसांत चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत!”
८ परंतु येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता?
९ तुम्हांला अजून समजत नाही काय? पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या?
१० तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?
११ मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”
१२ तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.