१ मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकान्ती नेले.
२ तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.
३ तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.
४ मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”
५ तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”
६ हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले.
७ तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.”
८ मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही.
९ नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.’
१० त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “मग एलीया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?”
११ त्याने उत्तर दिले, “‘एलीया’ येऊन सर्वकाही ‘यथास्थित’ करील हे खरे;
१२ पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया तर आलाच आहे आणि त्यांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले; त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.”
१३ तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याविषयी हा आपणांस सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.