१४ नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,
१५ “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा; कारण तो फेफरेकरी असून त्याचे फार हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो.
१६ मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.”
१७ तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”
१८ नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.
१९ नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?”
२० तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.
२१ [तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.] ”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.