१ त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”
२ तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले,
३ “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
४ ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय;
५ आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
६ माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्यात त्याचे हित आहे.
७ अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार!
८ तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे.
९ तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे.
१० सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.
११ [आणखी, जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे.]
१२ तुम्हांला काय वाटते? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय?
१३ आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचीत सांगतो.
१४ तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.