१५ तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल.
१६ परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’
१७ आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.
१८ मी तुम्हांला खचीत सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
१९ मी आणखी तुम्हांला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल.
२० कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”
२१ तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”
२२ येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.
२३ म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले.
२४ आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले.
२५ त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’
२६ तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’
२७ तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले.
२८ तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’
२९ ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’
३० पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले.
३१ तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दु:खी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले.
३२ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते;
३३ मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’
३४ मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्यांच्या हाती दिले.
३५ म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.