१ मग असे झाले की, हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात गेला;
२ तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले.
३ मग परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?”
४ त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’,
५ व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’
६ ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
७ ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?”
८ तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते.
९ मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”
१० शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.”
११ तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात.
१२ कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणांस नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”
१३ नंतर त्याने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले; परंतु शिष्यांनी आणणार्यांना दटावले.
१४ येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
१५ मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.