१६ नंतर पाहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, “उत्तम गुरूजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?”
१७ तो त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे; तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”
१८ तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस,
१९ आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’
२० तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?”
२१ येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”
२२ पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती.
२३ तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे.
२४ मी आणखी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
२५ हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क
२६ येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”
२७ तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?”
२८ येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.
२९ आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;
३० परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.