१७ येशू वर यरुशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले,
१८ “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल; ते त्याला मरणदंड ठरवतील,
१९ आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास व वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि तिसर्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल.”
२० तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले.
२१ त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.”
२२ येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? [आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय?]” ते त्याला म्हणाले, “आम्हांला शक्य आहे.”
२३ त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल खरा, [व जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्याल,] पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.”
२४ ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.
२५ पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे.
२६ तसे तुमच्यामध्ये नसावे; तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल,
२७ आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.
२८ ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”
२९ मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला.
३० तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.”
३१ त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.”
३२ येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?”
३३ ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.”
३४ तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.