१८ मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली.
१९ आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.
२० हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?”
२१ येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल.
२२ आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हांला मिळेल.”
२३ नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?”
२४ येशूने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हांला सांगेन.
२५ योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
२६ बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.”
२७ तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.