३१ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’
३२ परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.”
३३ पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”
३४ येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
३५ पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले.
३६ नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
३७ मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला.
३८ तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
३९ मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
४० मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही?
४१ तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”
४२ आणखी त्याने दुसर्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
४३ मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते.
४४ नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.
४५ आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.
४६ उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.