४७ तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता.
४८ त्याला धरून देणार्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.”
४९ मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.
५० येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली.
५१ मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.
५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.
५३ तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?
५४ पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?”
५५ त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही.
५६ पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.