१ प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली;
२ आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.
३ तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला,
४ “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”
५ मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला.
६ मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.”
७ मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.
८ ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात.
९ तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले
१० आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.