११ मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच.”
१२ मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.
१३ तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?”
१४ परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले.
१५ त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती.
१६ आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.
१७ म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”
१८ कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते.
१९ तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”
२० इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.
२१ सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.”
२२ पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
२३ तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
२४ ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”
२५ सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”
२६ तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.