२७ नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.
२८ त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला;
२९ काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.
३० ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले.
३१ मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.
३२ ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले.
३३ मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर
३४ त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
३५ त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची ‘वस्त्रे वाटून घेतली;’ [जे संदेष्ट्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले; ते असे की, ‘त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या’].
३६ नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले.
३७ त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.”
३८ त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
३९ आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की,
४० “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.”
४१ तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले,
४२ “त्याने दुसर्यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
४३ ‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.”
४४ जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.