४५ मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
४६ आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
४७ तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला हाक मारतो.”
४८ मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो ‘आंबेने’ भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला.’
४९ इतर म्हणाले, “असू दे, एलीया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू.”
५० मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.
५१ तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले;
५२ थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;
५३ आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.
५४ शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.
५५ तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या.
५६ त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या.
५७ मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता.
५८ त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली.
५९ योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले;
६० ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.
६१ पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या.
६२ दुसर्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले,
६३ “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.
६४ म्हणून तिसर्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.”
६५ पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.”
६६ मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
Copyright © 2012 by the Bible Society of India. Used by permission. All rights reserved.